“बोला, काय त्रास होतोय?..”
“डॉक्टर, खूप डिप्रेशन आलं आहे, कसलाच उत्साह राहत नाही, काहीच करायची इच्छा होत नाही…”
“काही विशेष कारण? एखादी वाईट घटना??”
“नाही डॉक्टर, अगदी सुरळीत आहे सगळं…घरकामाला बाई आहे, मुलगा 8वीत शिकतोय, नवरा प्रेमळ आहे…तरीही का असं होत असेल??”
“ठीक आहे तुम्ही बाहेर जा, मी तुमच्या मिस्टरांशी बोलतो जरा…
डॉक्टर ने सांगितलं तसं शिल्पा बाहेर गेली….
डॉक्टर अजय ला विचारू लागले…
“तुम्हा दोघांत काही वाद?? काही भांडणं??”
“अहो सांगतो काय डॉक्टर, आमच्यात कसलाही वाद नाही की काय नाही, पण ही सतत चिंतेत दिसते, कसलाही उत्साह नाही तिला…तिची ही अवस्था बघून मलाच खूप काळजी वाटली म्हणून तिला तुमच्याकडे घेऊन आलो…”
“बरं मला शिल्पा चा दिनक्रम सांगा….”
“सकाळी उठते, चहा बनवते, मग स्वयंपाकिन येऊन नाष्टा, जेवण बनवते, कामवाली घरातला झाडू पोचा भांडी कपडे आवरून घेते…त्यावेळात शिल्पा मोबाईल वर काहीतरी बघत टाईमपास करते… मग tv बघते…तिला म्हटलं नोकरी कर, मन रमेल तर तेही नाही म्हणते…”
“इतका राणीसारखा थाट असून शिल्पा ला कसलं डिप्रेशन??” डॉक्टर विचार करू लागले…
“ठीक आहे मी काही गोळ्या देतो, त्या घ्यायला लावा आणि 8 दिवसांनी परत या…”
शिल्पा आणि अजय निघून गेले. शिल्पा चा मोबाईल टेबल वरच राहिला होता…डॉक्टरांनी कंपाउंडर ला फोन केला पण तोवर ते दोघे निघून गेले होते….
डॉक्टर विचात करत बसले, ही केस जरा वेगळी दिसते, कारण कारणाशिवाय कोणी डिप्रेस होत नाही.
अजय ने शिल्पा चा सांगीतलेला दिनक्रम डॉक्टरांनी आठवला..
डॉक्टरांना लक्षात आले की यासगळ्याचं मूळ हा मोबाईल आहे…असं काय होतं असं त्या मोबाईल मध्ये? कोणाचा फोन येत असेल का? कोणी त्रास देत असेल का??
कारण शिल्पा जास्तीत जास्त वेळ मोबाईल मध्ये असायची, घरात करण्यासारखी काही कामं नव्हतीच…
डॉक्टरांनी शिल्पाचा मोबाईल चेक करायचा ठरवला…
तसं पाहिलं तर दुसऱ्याचा मोबाईल बघणं हे चुकीचं होतं पण शिल्पा च्या उपचारासाठी ते करावंच लागणार होतं…सुदैवाने मोबाईल ला कसलंही लॉक वगैरे नव्हतं…
डॉक्टरांनी व्हाट्सएप चालू केलं… सर्च बॉक्स मध्ये त्यांनी काही शब्द टाकले…
“त्रास”, “वाईट”, “दुःख”, “एकटेपणा”….
या संदर्भातील कुठलाही मेसेज आढळला नाही…
डॉक्टरांनी काही वेळ विचार केला..मग त्यांनी टाइप केलं..
“मज्जा”, “भारी”, “लकी”….
अश्या शब्दांचे भरमसाठ मेसेज सापडले…त्या मेसेज मध्ये रेखा, माधुरी, प्रेरणा आणि नम्रता अशा चार मुलींशी जास्त चॅटिंग झालेली….
नंतर डॉक्टरांनी फेसबुक ओपन केलं…त्यात ऍक्टिव्हिटी लॉग चेक केला…त्यातही या चार मुलींची प्रोफाइल आणि फोटोज बघितलेले….
काय संबंध होता या चौघींचा आणि शिल्पा च्या डिप्रेशन चा??
खूप विचाराअंती डॉक्टरांना काय समजायचं ते समजलं…इतक्यात दार वाजले, डॉक्टरांनी मोबाईल चे current apps पटापट बंद केले…शिल्पा आणि अजय आत आले, मोबाईल राहिला म्हणून घ्यायला आले, मोबाईल घेऊन परत गेले..
डॉक्टरांना त्या चौघींची नावं आणि फोटो चांगले लक्षात राहिले होते…
त्यांनी त्यांचा फोन फिरवला…
“शिंदे, जरा वेगळं काम आहे….” असं म्हणत डॉक्टरांनी शिंदे ला (कंपाउंडर ला) एका वेगळ्या मिशन वर धाडलं…
8 दिवसांनी शिल्पा आणि अजय परत आले…
“गोळ्यांनी काही फरक??”
“झोप जास्त येते,बाकी काही नाही…”
डॉक्टर उठले, त्यांचा खुर्चीमागे जाऊन हात खुर्चीच्या डोक्यावर टेकवत बोलू लागले…
“शिल्पा..तुझ्या मैत्रिणी रेखा,माधुरी, प्रेरणा आणि नम्रता…या जगातल्या सर्वात सुखी मुली आहेत असा तुझा गैरसमज असेल तर तो काढून टाक…”
खाली मान घालून बसलेली शिल्पा चक्रावली, एकदम मान वर करत म्हणाली…
“तुम्हाला कसं माहीत त्या माझ्या मैत्रिणी आहेत ते????”
अजय आणि शिल्पा अवाक होऊन बोलत होते…
“तुझा मोबाईल इथे राहिला होता, तुझी केस पाहता मला तो मोबाईल चेक करणं आवश्यक होतं…
तू कायम या चार मैत्रिणींसोबत स्वतःची तुलना करत आली आहेस…कॉलेज मध्ये तुमचा ग्रुप होता…तू चौघीत सर्वात हुशार…सर्वात सुंदर…लग्न झाली तशा चौघींच्या वाटा वेगळ्या झाल्या…
रेखा…नवऱ्यासोबत अमेरिकेत आहे…तिथले तोकड्या कापड्यातले फोटो ती सतत फेसबुक, व्हाट्सअप वर टाकत असते…तू सतत ते बघत स्वतःशी तुलना करतेस की मला का नाही असं जाता आलं परदेशात?? आतल्या आत कुढत त्यांना नको असतांना कंमेंट करतेस…”मज्जा आहे तुझी” , “भारी फोटो आहे” , “लकी आहेस” वगैरे….
माधुरी, एका कंपनीत मॅनेजर…आपल्या कंपणीतले सर्व इव्हेंट्स ती सोशल मीडिया वर टाकते, तू सतत ते बघत विचार करतेस की मला का नाही मिळवता आली ती पोझिशन?? मी सर्वात हुशार आहे पण लहान शहरात असल्याने मागे पडलीये का मी??
तसंच प्रेरणा आणि नम्रता चं…त्यांचे सततचे पिकनिक चे फोटो पाहून तुला वाटतं की आपल्या आयुष्यात का नाही असे क्षण??
तू त्यांचा नजरेतून स्वतःला बघतेस, त्यांना माझ्याबद्दल काय वाटत असेल? मी अशी घरी बसलेली, लाचार, कुढत जगणारी…अयशस्वी…दुबळी…मग अजय सोबत मन मोकळं करायलाही तू घाबरायचीस…कारण तो तुझ्यावर खूप प्रेम करत होता आणि त्यालाही तुला तुझ्या अपेक्षा लादून दुखवायचं नव्हतं… मग आतल्या आत कुढत तू डिप्रेशन स्वतःवर लादून घेतलंस….
शिल्पा च्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव उमटले, डॉक्टर शब्द न शब्द खरं बोलत होते…
“आणि ऐक, शिंदे कडून मी त्यांची वरवर माहिती काढली…ज्या रेखाच्या परदेशातील वास्तव्यावरून तुला हेवा वाटायचा…तिला एक असाध्य आजार आहे…रोज ती आजाराशी झगडत आहे…माधुरी… मॅनेजर असूनही तिच्या नवऱ्यावर तिला कंट्रोल ठेवता आलं नाही, तिचा नवरा बाहेर कुठल्यातरी मुलीत अडकला आहे….प्रेरणा अपत्यासाठी वणवण डॉक्टर वाऱ्या करते आहे आणि नम्रता कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडली आहे…या चौघी आपलं वरवरचं आयुष्य सोशल मीडिया वर टाकताय…त्या खालचं जळजळीत वास्तव कोण कशाला जगासमोर दाखवेल???
तू स्वतःच्या नजरेतून स्वतःकडे बघ…
जगात तुझ्याहून सुखी कोण आहे?? कौटुंबिक हिंसाचार तर लांबच…इतका प्रेमळ आणि प्रामाणिक नवरा तुला मिळालाय…निरोगी शरीर मिळालं आहे आणि तुझी ओंजळही तुला अपत्य मिळून भरलेली आहे…अजून काय हवं असतं सुखी आयुष्यासाठी?? तुलना करणं सोड…दुसऱ्याकडे आहे ते माझ्याकडे नाही म्हणून तू रडतेस, पण तुझ्याकडे जे आहे ते त्यांच्याकडेहीे नाही …हा विचार तू कधी केलाय???
एका क्षणात शिल्पा चे डोळे उघडले…एका नवीन उत्साहाचे, आनंदाचे आणि जोशाचे भरते तिला आले….
“डॉक्टर खरंच, मी चुकले….तुमच्यामुळे मी स्वताला माझ्या नजरेतून पाहू शकले…खरंच माझ्याहून सुखी कोण आहे या जगात?? माझी ओंजळ सुखाने पुरेपूर भरलेली असताना काल्पनिक मृगजळामागे मी धावत होते….स्वतःची तुलना इतरांशी करत होते….पण आता नाही…मनावरचं मळभ आता दूर झालंय…. आता शिल्पाचा एक नवीन जन्म झालाय…आनंदी, उत्साही आणि जोशपूर्ण अशी एक स्त्री म्हणून….”
डॉक्टर हसले…”कुठल्याही गोळ्यांची गरज नाही तुम्हांला… आयुष्य भरभरून जगा…आनंदाचे कण पेरत चला…बघा आयुष्य कसं प्रेमाच्या अंकुरानी फुलून येईल ते….”
दोघांनी डॉक्टरांना मनापासून धन्यवाद घेत निरोप घेतला…जाता जाता अजय म्हणाला…”तुम्ही “डॉक्टर सदावर्ते” पाटी काढून ” डिटेक्टिव्ह डॉक्टर सदावर्ते” अशी लावली तरी चालेल….”
त्याचा या वाक्यावर डॉक्टर आणि अजय खळखळून हसायला लागले….