**
image credit: eSakal
ज्ञानाचा दिवा महाराष्ट्रातल्या मनामनात पेटवणार लोकांच्या मनात स्वाभिमान रुजवणारा देव दगडात नसतो माणसात असतो हे हेरून इथल्या माणसांमध्ये माणुसकी पेरणारा “लोकमहर्षी”, “शिक्षणमहर्षी” म्हणजेच “कर्मवीर भाऊराव पाटील”.
बहुजनांच्या मुलांमध्ये शिक्षण प्रसार करणारा देवमाणूस कर्मवीर भाऊराव पाटील. आताचे सगळे “शिक्षणसम्राट” आहेत पण खऱ्या अर्थाने “शिक्षणमहर्षी” असणारे कर्मवीर भाऊराव पाटील.
एकवेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलीन पण वसतीगृहाला दिलेलं “शिवाजी महाराजांचं” नाव नाही बदलणार अस छातीठोक पणे सांगणारे “कर्मवीर भाऊराव पाटील”.
ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज 100 वर्षांपूर्वीच ओळखणारा शिक्षणमहर्षी. ग्रामीण शिक्षण चळवळीचे जनक म्हणजेच “कर्मवीर भाऊराव पाटील. लोकशाहीचा मुळगाभा लोकशिक्षण हे आहे आणि हे लोकशिक्षण समाजाला विकासाकडे नेते हे कर्मवीरांनी ज्ञात होत म्हणून अनवाणी पायांनी वणवण करून अवघा महाराष्ट्र पिंजून काढून शिक्षणाची गंगा बहुजनांच्या झोपडी झोपडीत आणि झोपडतीतल्या खोपडी खोपडीत करणारे कर्मवीर भाऊराव पाटील होते.
ज्या महाराष्ट्राच्या पवित्र मातीत “कर्मवीरांसारखा” “शिक्षणमहर्षी” जन्माला आला त्याच महाराष्ट्राच्या मातीत आजच्या “शिक्षणसम्राटांनी” शिक्षणव्यवस्थेचे चित्र काय निर्माण केलय तर “शिक्षणाचा संबंध पदव्यानशी पदव्यांचा संबंध नोकरीशी नोकरीचा संबंध चाकरिशी चाकरिचा संबंध छोकरीशी या छोकरीचा संबंध भाकरीशी आणि भाकरीचा संबंध परत नोकरीशी” अशी अवस्था करून ठेवलीय. त्यामुळे कर्मवीरांसारख्या शिक्षणमहर्षी असणाऱ्या माणसाचं व्यक्तीमत्व तरुणांना माहीत होणं ही काळाची गरज बनली आहे.
22 सप्टेंबर 1887 रोजी भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला.
त्यांचे वडील पायगोंडा पाटील हे रोड कारकून होते. भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण विटे, दहिवडी अश्या वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी झाले.
1902 ते 1907 या वर्षी ते कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये शिकले. शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांचे बाह्य रूप पाहून विद्यार्थी त्यांच्यावर हसले. शालेय अभ्यासक्रमात ते मागे असले तरी ते कुस्ती, पोहणे, मल्लखांब याक्रीडाप्रकारांत ते पटाईत होते. ते इंग्रजी सहावी म्हणजे आताची दहावी शिकले.
10 वी नापास असणाऱ्या या विद्यार्थाने ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यांपर्यंत नेली. कोल्हापुरात असताना भाऊराव कोल्हापूर येथील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये राहत असत ही बोर्डिंग 1905 मध्ये राजर्षी शाहूंनी सुरू केली.
1908 मध्ये मिस क्लार्क होस्टेल या अस्पृश्य मुलीच्या वसतिगृहाच्या उदघाटन कार्यक्रमास गेले म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा स्नान करावे हा आदेश न पाळल्यामुळे त्यांना वस्तीगृहातून काढून टाकले गेले.
बाळासाहेब खानविलकर या त्यांच्या मित्राने झाला प्रकार ऐकून त्यांना शाहू महाराजांच्या वाड्यावर आणले व राजवाड्यातील विद्यार्थी कक्षात त्यांची राहण्याची व्यवस्था केली.
कोल्हापुरात शिक्षण घेत असतानाच त्यांच्या जीवनावर महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी यांच्या जीवनाचा खूप प्रभाव पडला. या 3 महान लोकांमुळेच भाऊरावांच्या मनात समाजसेवेचे शुद्ध बीज अंकुरित झाले. शिक्षण हाच सर्व सुधारणांचा पाया आहे अशी त्यांची खात्री पटली. शिक्षणाच्या अभावामुळेच आपली पीछेहाट झाली आहे याची त्यांना अगदी तरुण वयातच जाणीव झाली.
त्यामुळेच त्यांनी 1909 मध्ये काही मित्रांच्या सहकार्याने वाळवे तालुक्यातील दुधगाव येथे “दुधगाव विद्यार्थी आश्रम” ही संस्था काढली व भाऊरावांच्या शैक्षणिक कार्यास प्रारंभ झाला.
काले या सातारा जिल्ह्यातील कराड या गावी 1919 मध्ये सत्यशोधक परिषदेचे अधिवेशन भरले होते. ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था स्थापन करावी अशी विनंती भाऊरावांनी केली आणि ती मान्यही झाली. दिन, दलित, बहुजन मुलांना शिक्षण दिले पाहिजे असा विचार त्यांनी मांडला.
शेतकरी म्हणजेच रयत. रयतेला शिक्षण देणारी संस्था म्हणूनच या संस्थेला “रयत शिक्षण संस्था” असे नाव देण्यात आले. अश्या तर्हेने 5 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्था स्थापन झाली. श्रम, स्वावलंबन व समता या 3 तत्वांवर त्यांच्या शैक्षणिक कार्याचा वटवृक्ष आधारलेला होता.
“ज्याच्या हाताला घट्टा व चट्टा नाही तो स्वावलंबी विद्यार्थी नाही” असे भाऊराव म्हणत असत.
शिक्षणामध्ये शारीरिक श्रमाची प्रतिष्ठा प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न भाऊरावांनी केला. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच काम केलं पाहिजे व त्यातून शिक्षणाचा खर्च भागवला पाहिजे असे ते बोलत असत.
संस्थेचा दैनंदिन कारभार पाहता यावा म्हणून त्यांनी किर्लोस्कर कारखान्यातील कामाचा राजीनामा दिला. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन, पुस्तके, वह्या, पाटी हा खर्च भागवण्यासाठी लोकांचा सहभाग व आस्था निर्माण केली. लोकसहभागातून संस्थेचा खर्च भागवला जाई. दुधगाव, कार्ले, नेर्ले या 3 ठिकाणी प्रथम जी वसतिगृह स्थापन केली होती त्यांचा खर्च भागवण्यासाठी प्रसंगी त्यांनी आपली पत्नी लक्ष्मी यांचे मंगळसूत्र देखील विकले होते.
1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना जरी झाली असली तरी आपल्या कार्यास व्यापक रूप देण्यासाठी 1924 मध्ये भाऊरावांनी सातारा येथे सर्व धर्माच्या, पंथाच्या व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह काढले. 1927 साली महात्मा गांधींनी या वस्तीगृहाला भेट दिली सर्व जाती धर्मातील विद्यार्थी एकत्र राहतात हे पाहून गांधीजींना खूप आनंद झाला होता.
भाऊरावांच्या पत्नीनेही आपले सर्व जीवन वसतिगृहाच्या कामातच देण्याचे ठरवले. पुढे तर त्यांच्या पत्नीने आपले सर्व जीवनच संस्थेसाठी व्यतीत केले.
1932 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी “युनियन बोर्डिंग हाऊस” या नावाने वसतिगृह पुणे येथे फर्ग्युसन टेकडीच्या मागे असलेल्या वडार वस्तीजवळ झोपड्या बांधून सुरू केलं.
4 एप्रिल 1933 रोजी बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड हे सातारा येथे आले तेव्हा त्यांनी शाहू बोर्डिंगला भेट दिली.
महाराजांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली तिथल्या भाकरी व पिठले याचा आस्वाद देखील घेतला. ते स्वतः शिक्षणाचे चाहते होते त्यांनी भाऊरावांना 4000 रुपयांचा चेक दिला व त्यातून बहुजन समाजाला महागडे इंग्रजी शिक्षण मोफत मिळावे अशी इच्छा प्रकट केली.
1935 मध्ये सिल्वर ज्युबली रूरल ट्रेनिंग कॉलेज त्यांनी सातारा येथे सुरू केले. “म.फुले अध्यापक विद्यालय” असे त्या विद्यालयाचे नाव होते.
1940 मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वतीने पहिले माध्यमिक विद्यालय “महाराज सयाजीराव गायकवाड फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल” सुरू झाले.
त्यासाठी फलटणचे राजेसाहेब श्रीमंत मालोजीराजे निंबाळकर यांनी 10 एकर जमीन, 1 बंगला व रोख 5000 देणगी दिली होती.
शाळेतील विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहणे, शाळेची स्वच्छता करणे, जमाखर्च लिहिणे, शेतीत कामे करणे ही कामे करावी लागत तेथे सर्व शिक्षण मोफत होते. “कमवा व शिका” हा उपक्रम शाळेत राबवला जाई.
रयत शिक्षण संस्थेची आज 320 हायस्कूल, 29 महाविद्यालये, 572 शाळा व वसतिगृहे आहेत. रयत शिक्षण संस्था, सातारा ही फक्त महाराष्ट्रातील किंवा भारतातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे असे नाही तर संपूर्ण आशिया खंडात एवढी मोठी शाखात्मक विस्तार असलेली संस्था नाही.
आज सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई, अहमदनगर, नाशिक, बीड या 14 जिल्ह्यात संस्थेचा शाखाविस्तार झालेला आहे.
गांधी हत्येनंतर सातारा येथे गांधीजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी झालेल्या सभेत तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्याविरोधात अपशब्द काढले म्हणून संस्थचे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला.
अत्यंत परिश्रमाने वाढलेली रयत शिक्षण संस्था बंद पडण्याचा धोका उत्पन्न झाला. मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर मोराजजी देसाई यांनी तर भाऊरावांच्या उल्लेख एका सभेत “सैतान” असा केला.
तेव्हा एका सावकाराने कर्मवीरांनी सांगितलं मी मदत करतो पण तुमच्या वस्तीगृहाला माझं नाव द्या तेव्हा कर्मवीर कडाडले “एकवेळ मी जन्म देणाऱ्या माझ्या बापाचं नाव बदलीन पण माझ्या वस्तीगृहाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं” नाव कधीच बदलणार नाही.
त्यांनी स्वतः तसेच शंकरराव मोरे, केशवराव जेधे, बापूजी साळुंखे आदींनी महाराष्ट्रात झंझावाती दौरा करून संस्थेसाठी पैशाचा पाऊसच पडला.
भाऊरावांनी आपली बाजू जनतेपुढे मांडली. 52 दिवसात 53000 रुपये संस्थेला देणगी मिळाली. शेवटी 23 जानेवारी 1949 रोजी सरकारने अनुदान चालू केले.
भाऊरावांनी शिक्षणाविषयी पुरोगामी विचार मांडले. शिक्षण साध्य नसून साधन असे असे ते म्हणत असत. शिक्षणातून नवचैतन्य, नवमानव व नवसमाज निर्माण झाला पाहिजे असे त्यांचा विचार होता.
शिक्षण घ्या, शहाणे व्हा, पालकांचे दारिद्र्य आड येऊ देऊ नका, घाम गाळून शिका, समाजाच्या उपयोगासाठी शिका असे त्यांचे विचार होते. शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ साधन आहे शिक्षणामुळे माणूस बहुश्रुत होतो असे ते म्हणत.
“स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” हे रयत शिक्षण संस्थेचे बोधवाक्य होते. भाऊराव पाटील म्हणजे महाराष्ट्रातील रविंद्रनाथ टागोर होत. भाऊरावांची राहणी अत्यंत साधी होती.
1910 पासून भाऊरावांनी खादीचे व्रत स्वीकारले व अखेरपर्यंत त्याचे पालन केले. त्यांचे वर्षांचे कपडे म्हणजे 4 नेहरू शर्ट, चार धोतरे, 2 पंचे, खांद्यावर घोंगडी, हातात काठी असे.
भव्य देहयष्टी, छातीत रुळनारी पांढरी शुभ्र दाढी, प्रभावी व्यक्तिमत्त्व, पहाडी आवाज, अमोघ वक्तृत्व ही त्यांची वैशिष्ट्य होती. पुण्यात उच्च शिक्षणासाठी ठेवलेल्या मुलांकरिता भाऊराव स्वयंपाकाचे साहित्य डोक्यावर घेऊन अनवाणी येत असत. स्वतः ते खेड्यापाड्यांत अनवाणी फिरून जातपात न पाहता हुशार अशी मुले शिकायला साताऱ्यात आणत असत.
भाऊराव यांना रक्तदाबाचा आजार होता व उपचारांसाठी 1944 मध्ये मुंबई 7 हॉस्पिटलमध्ये होते. ते आपल्या प्रकृतीकडे फारशे लक्ष देत नसत प्रकृती थोडी ठीक झाली की ते लगेच कामाला लागत असत.
भारत सरकारने 26 जानेवारी 1959 ला त्यांना “पद्मभूषण” ने सन्मानित केले. भाऊराव तेव्हा म्हटले होते “मला जनता जनार्दनाने दिलेली कर्मवीर ही पदवी त्याहून श्रेष्ठ आहे”. ते आपल्या नावाखाली ‘रयतसेवक’ अशी पदवी लावत. शिक्षणाला एक नवी दृष्टी भाऊरावांनी दिली.
‘श्रम करा व शिका’, ‘स्वावलंबी शिक्षण’ हे त्यांच्या शिक्षणकार्यातील नवे तत्वज्ञान होते.
शिक्षणाच्या आड गरिबी येत नाही हा एक नवीन विचारच त्यांनी आपल्या कार्यातून मांडला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य माहिती निबंध मराठी
पुणे विद्यापीठाच्या “D.Litt” ही पदवी भाऊराव पाटील यांना गव्हर्नर श्री.प्रकाश यांच्या हस्ते दिली. ही पदवी देण्यासाठी ससून रुग्णालयात कुलगुरू रँग्लर परांजपे व विद्यापीठ रजिस्ट्रार गेले होते.
पुणे विद्यापीठाच्या “D.Litt” ही पदवी भाऊराव पाटील यांना गव्हर्नर श्री.प्रकाश यांच्या हस्ते दिली. ही पदवी देण्यासाठी ससून रुग्णालयात कुलगुरू रँग्लर परांजपे व विद्यापीठ रजिस्ट्रार गेले होते.
भाऊरावांनी अनेक मुले शिक्षणासाठी परदेशात पाठवली होती. परदेशात विद्याविभूषित होऊन आलेले विद्यार्थी परत संस्थेमध्येच काम करू लागले.
9 मे 1959 रोजी भाऊराव पाटील यांचे निधन झाले. भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘कमवा व शिका’ योजना चालू करून श्रमप्रतिष्ठेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. स्वावलंबी शिक्षण हा प्रयोग बहुदा देशात पहिलाच असावा. गेल्या 100-150 वर्षांत भाऊराव पाटील यांच्यासारखा लोकोत्तर पुरुष झाला नाही.
पंडित नेहरू कर्मवीरांबद्दल बोलतात “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी क्रांती केली आहे. श्रमातून शिक्षण प्राप्त करण्याचा महान मूलमंत्र त्यांनी जनतेला दिला व मानवी समतेचा दिव्य आदर्श जनतेपुढे ठेवला”.
यशवंतराव चव्हाण बोलतात “जनता शिक्षणाचा नाव पायंडा पाडून बहुजन समाजात शिक्षणाने क्रांती घडवून आणणे हे त्यांचे ध्येय होते. सामर्थ्यवान व गुणवत्येने युक्त अशी माणसे तयार करणे हे त्यांच्या कार्याचे रहस्य होते”. ना.ग.मोरे यांच्या मते ” कर्मवीर महाराष्ट्राला लाभलेले विश्वामित्र होते शून्यातून ब्रम्हांड निर्माण करण्याची करामत भाऊरावांनी करून दाखवून भाऊरावांनी महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेवर अनंत उपकार केले आहेत”.
ह.रा.महाजणींच्या मते “भाऊराव पाटील हे महाराष्ट्राचे बुकर-टी वॉशिंग्टनच होते”. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मते “भाऊरावांनी बहुजन समाजाची प्रामाणिकपणे सेवा केली. जातीभेद तोडून टाकण्याची शिकस्त केली. समाजावर द्यानामृताचा वर्षाव केला’.
ह्याच कर्मवीरांच्या महाराष्ट्रात आज शिक्षण क्षेत्राचा बाजार चाललंय अस चित्र दिसतंय शिक्षणाचा व्यापार करणारे लोक महाराष्ट्रात आलेत. भाऊरावांचा महाराष्ट्र आज खाउरावांचा झालाय असच सगळीकडं दिसतंय आज. त्यामुळेच कर्मवीरांबद्दल म्हणावेसे वाटते.
“आदर्शच तू लोकनायक धर्मसंस्कृतीचा अग्रदूत तू समाजपुरुषा ज्ञानक्रांतीचा
झोपडीत तू हसत लाविला विद्येचा दीप बहुजन हसला बहुमणी जळता शतकांचे पाप”
*विद्येच्या या दिपस्तंभास त्रिवार वंदन*
No comments:
Post a Comment