YouTube

Sunday, 30 September 2018

अति लाड म्हणजे प्रेम का?

अति लाड म्हणजे प्रेम का?

माझा  एक वकिलमित्र सांगत होता की, त्याच्यांकडे एक घटस्फोटाची केस आली. केस अशी होती की, नवीन लग्न झाले होते. नवरा पगार झाला की , बायकोच्या हाती द्यायचा. बायको पहिल्या चार-पाच दिवसातच सर्व पगार शॉंपिंगवर खर्च करुन मोकळी व्हायची. असे दर महिन्याला होत गेले. त्यामुळे नवर्‍याचे आर्थिक गणित चुकले. तो तीला म्हणाला की, ‘‘पैसे जपुन खर्च करत जा!".
बस त्यावरुन भांडण करुन बायको माहेरी गेली. तिच्या आईने जावायांना बोलावून सांगितली की, ‘‘तिची हौस-मौज करा, पैसे कमी पडले तर माझ्या कडून घ्या!’’ हे सासूबाईंचे वाक्य ऐकून मुलगा तडक उठला आणि त्याने घटस्फोटाची मागणी केली. पुढे त्यांचा घटस्फोट पण झाला. आता यात नक्की काय घडले?.. नक्की चुक कोणाची होती?.. मुलगा अत्यंत स्वाभिमानी होता. त्याने त्याचे करीयर स्वत:च्या हिमंतीवर बनवले होते. तर मुलगी अत्यंत लाडात वाढलेली होती. पुढे समुपदेशनात लक्षात आले की, मुलगी एकुलती एक..
लहानपणी ही मुलगी ज्या दुकानाच्या बाहेर उभी राहील त्या दुकानातल्या वस्तू गरज नसतांना पालक विकत घेत असायचे. ‘‘काय हवे माझ्या शोनुलिला?.. बार्बी गर्ल?’’ ओके..! लगेच तिला ती बाहुली मिळत गेली. तोंडामधुन एखादी मागणी आली की लगेच हट्ट म्हणून ती पुरवली जायाची.. या पध्दतीने ती लहानाची मोठी झाली. आणि लग्नझाल्यावर वर्षभराच्या आत माहेरी आली.
पालकांनो लहान मुलांचे मानसिक स्वास्थ आणि भावनिक स्वास्थ हे तुम्ही त्याच्यांशी लहानपणी कसे वागतात त्यावर अवलंबुन असते. पालक मुलांचे लाड करणच्या नादात कुठे थांबायचे हे सुध्दा विसरतात.
‘‘मागीतले की मिळतं’’ ही सवय जर मुलांना लागली की, पुढे हे जड जाते. अशा मुलांना वाईट सवयी लवकर लागतात आणि तर मुली लवकर बिघडतात. नकाराची सवय राहिली नाही तर मोठ्यापणी साधा प्रेमभंग सुध्दा पचवता येत नाही,  ना ऑफिसमध्ये वरिष्ठांशी जुळवून घेता येते. याचे कारण पालक मुलांमुलीचे प्रत्येक प्रश्‍न स्वत: सोडवण्याच्या भानगडीत पडतात. कॉलनीत मुला-मुलांचे भांडण झाले तर आई लगेच शेजारच्यांशी भांडायला जाते. शाळेत थोडं टिचर रागावली की बाबा लगेच मुख्याध्यापकांना भेटतात. मुलाला एका डान्समधुन काढून दुसर्‍या डान्समध्ये अथवा दुसर्‍या परफॉर्मन्स मध्ये टाकले की लगेच टिचर्सला फोन करुन जवाब विचारतात.. या सर्वामधुन मुलांना आयती उत्तरे मिळतात. नकार पचवून घ्यायची सवय लागत नाही.
पालक जेव्हा गरज नसतांना पाल्याचा हट्ट पुरवतात. पैसे नसतांना सुध्दा मुलांचे फाजील लाड पूर्ण करतात आणि त्याला गोंडस शब्दांची झालर देतात आणि ती झालर म्हणजे ‘‘आमचे लहानपणी असे लाड झाले नाही, मला जे मिळाले नाही ते मी माझ्या मुलां-मुलीला देईल’’ आणि या कृतीलाच पालक प्रेम करणे असे म्हणतात.
खरं तर प्रेम आणि काळजी यांचा समतोल साधायचा असतो, कारण दोघं जास्त झाले की, वाढ खुटण्याची भीती असते. मागणी आणि पुरवढा यांचा योग्य समतोल पालक आणि पाल्यामध्ये होणे गरजेचे असते.
आपण मुलांशी लहानपणी कसे वागतो त्यावर भविष्यातील त्यांची वर्तवणुक ठरत असते. म्हणून मागीतले ते मिळते ही सवय मुलांना लावु नका. मोठ्या माणसांनी, शिक्षकांनी किंवा क्लास टीचर ने त्याच्या भल्यासाठी काही ऍक्शन घेतली असेल तर त्यावेळेस टिचर्सला सहकार्य करा. कारण शेवटी मुलं  मोठ्यापणी सर्वांनमध्ये मिळून मिसळून राहणं, उत्तम संवाद साधणे हे महत्वाच असते आणि याला अडथळा असतो अति लाड! अति प्रेम!! शिस्त ही प्रेमाची पहिलि कृति आहे.

श्री.  विश्वास नांगरे पाटील...IPS.

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...