खरंच! हा दुष्काळ आहे, की....
की हे तळतळाट आहेत...
लग्नात कूंकू माखून उधळल्या शितांचे...!
गुलाबजामुनच्या पाकातून गटारात फेकलेल्या साखरेचे...
तिला बनवणार्या उसाचे...
उसासाठी राबलेल्या शेतकर्याचे...!
इडली खाऊन उरलेल्या सांबाराचे...
त्यात शिजलेल्या डाळीचे...
तिच्याबरोबर फेकल्या गेलेल्या शेवग्याचे...!
यांच्या खताचा मारा झेलून नापीक झालेल्या मातीचे,
तिच्यात उसवलेल्या अन्नसाखळीतील अळीपासून घारीचे...!
तहान भागताच फेकलेल्या अर्ध्या ग्लास पाण्याचे...
वॉटर किंगडममधून समुद्रात गेलेल्या गोड्या सांडपाण्याचे,
मोर्चात रस्त्यावर, श्रावणात पिंडीवर ओतलेल्या दुधाचे,
ते न मिळालेल्या वासराचे...!
वाढदिवशी न कापता तोंडाला फासलेल्या केकचे...
एनए शिक्का मारून घराखाली गेलेल्या शेतांचे,
बीअर आणि शीतपेयात नासलेल्या पाण्याचे...
शँपेनच्या कारंजातून जमिनीवर सांडलेल्या द्राक्षांचे...!
मातीमोल.. मातीमोल ठरलेल्या मातीचे...!!
No comments:
Post a Comment