शाळेने पत्रक काढलं,'; यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल !
आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे, खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की, अगदी एक विजार, एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात.
गरीब मुलगा शोधायचा कसा ? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब; तेही सर्वात गरीब म्हणून? मोठीच अडचण होती. तीन - चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे ;पण लहान मुलांमधे अडचणीचं .शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची.
मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं ," मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब.......?"
क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले," सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं, तो सर्वात गरीब आहे."
मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. "कशावरून म्हणता?"
" सर. त्याचा सदरा दोन- तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय. त्याने शिवलाय; पण फ़ाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पॅंट तर नीट बघा , मागून दोन ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो . तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो. सर, ती भाकरीही कालचीच असते. भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो, तो सर्वात गरीब आहे. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी."
मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली . पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते. मयूर एवढा गरीब असेल? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत? कारण, मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ, मोकळं होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं, " पाहिलंस ! हे सातवीतल्या मुलाचे अक्षर.असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते.उत्तराला सुबक परीच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे........."
पेपर चे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई. माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे......
असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये, या गोष्टीचीच मला खंत वाटली . जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो......अरेरे!...,
मी खूप कमी पडतोय. मयूर , गेल्या सहलीला आला नव्हता. अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती; पण त्याचं नाव यादीत नव्हतं. आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही. असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती. केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले. एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता.यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? मयूर स्वत:हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता!
शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो. खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं नाव. आर्थिक मदत, तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी. आता शंकाच नव्हती. त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन टाकले'; मयूर जाधव, सातवीअ, अनुक्रमांक बेचाळीस';
डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, " खात्री केलीये ना सर? कारण थोडीथोडकी रक्कम नाही. या विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश, इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे."
मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं, " सर, त्याची काळजीच करू नका. वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर मयूर जाधवच आहे!"
एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो. मयूरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही.
दुस~या दिवशी शाळेत लवकरच गेलो. देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता. त्यावर 'गरीब असूनही आदर्श ' असं म्हणून मयूरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो. इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला.
त्याच्या चेह~यावरचा भाव समजत नव्हता. राग आवरावा तसा करारी चेहरा... " सर, रागवू नका; पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका." अरे, काय बोलतोयस तुला समजतय का?" तो म्हणाला, "चुकतही असेन मी . वाट्टेल ती शिक्षा करा; पण ते नाव...!!"
त्याच्या आवळलेल्या मुठी, घशातला आवंढा, डोळ्यातलं पाणी......मला कशाचाच काही अर्थ लागेना. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत, तो असा.....?
" सर, मला मदत कशासाठी? गरीब म्हणून? मी तर श्रीमंत आहे."
त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती.येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते. शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती.
"अरे पण....?"
"सर, विश्वास ठेवा. मी श्रीमंत आहे. कदाचित सर्वात श्रीमंत असेन...सर, मी गरीब आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला; पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज."
अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो, " ठीक आहे. तुला नकोय ना ती मदत, नको घेऊस; पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय?"
" सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा, कुठल्याही विषयाच्या.... त्या पूर्ण आहेत. पुस्तकं मी Second Hand वापरतोय ...खरयं ! पण मजकूर तर तोच असतो ना? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का? सर, माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत. सर...सर,सांगा ना, मी गरीब कसा?"
मयूर मलाच विचारत होता आता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं.
"खरयं मयूर. पण तुला या पैशाने मदतच......."
" सर, मदत कसली? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर, मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन! "
"म्हणजे?"
" वडील घरांना रंग द्यायचे काम करतात. Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात. चार पैसे मला मिळतात, ते मी साठवतो. सर, संचयिका आहे ना शाळेची, त्यातलं माझं पासबुक बघा. पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात... मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते..... म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं. पण सर, मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे. घरातले सगळे काम करतात. काम म्हणजे कष्ट. रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात.आई धुणं-भांडी करते. मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते. सर, वेळ कसा जातो, दिवस कसा संपतो ते कळतच नाही. शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत. तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी. सर, माझ्या घरी याच तुम्ही, माझ्याकडे पु.ल. देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे. ........सर, आहे ना मी श्रीमंत?"
आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता. सर, शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो. रात्री देवळात होण्या-या भजनात मीच पेटीची साथ देतो. भजनीबुवा किती छान गातात! ऐकताना भान हरपून जातं."
त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता. अभावितपणे मी विचारलं," व्यायामशाळेतही जातोस?"
"सर, तेवढी फ़ुरसत कुठली? घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो ."
अंगावर एक थरार उमटला... कौतुकाचा.
" मयूर मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो.तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा .."
" म्हणूनच म्हणतो सर......!"
" हे नाव ज्या कारणासाठी आहे, त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून, हे पारितोषीक तरी........."
" सर, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाउ द्या. मी लिंकनचं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचलं, हेलन केलरचं महात्मा फुले यांचे चरित्र वाचलं. सर, हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली. माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा; पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल... सर.....प्लीज.....!"
वाचनानं, स्पर्धांतल्या सहभागानं , कलेच्या स्पर्शानं, कष्टानं....... त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती, संस्कारामुळे नम्रतेची झालर होती. आता मला माझ्या समोरचा मयूर जाधव स्पष्ट दिसतही नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते.
शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता. परिस्थिती पचवून, परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा ! श्रीमंत!
======================
एक अप्रतिम सुन्दर लेख....
प्रत्येकाने जरुर वाचावा असा.......कृपा करून वेळ काढून वाचा.. आवडल्यास शेअर करावा
====================
लेख एकदम मस्त, छान आहे. प्रत्येक पालकाने घरी आपल्या मुलांना मुद्दाम वाचून दाखवावा..
Please visit and read my articles and if possible share with atleast one needy person accordingly |
http://lokgitbhajanevamkahaniya.blogspot.in/ |
http://taleastory.blogspot.in/ |
http://allinoneguidematerial.blogspot.in |
Watch my videos |
https://www.youtube.com/channel/UC4omGoxEhAT6KEd-8LvbZsA |
Please like my FB page and invite your FB friends to like this |
https://www.facebook.com/Rohini-Gilada-Mundhada-172794853166485/ |
No comments:
Post a Comment