सहज वाचनात आलेली एक कविता मी आज इथे शेयर करत आहे. कृपया वाचा शेवटपर्यंत. या कवितेचे कवी कोण हे तर माहित नाही पण कविता नितांत सुंदर आहे.
उपवर झालेली लेक एका वडिलांसाठी काय असते हे खरंच फार छान या कवितेत सांगितले आहे कवी मोहोदयांनी.
लेकी कडून दुःख मला
कधीच नाही मिळालं
चिमणी कधी मोठी झाली
काहीच नाही कळालं........
पोरगी जाणार म्हणलं की
पोटात उठतो गोळा
अंथरुणावर पडतो पण
लागत नाही डोळा.........
खरंच माझी लेक आता
मला सोडून जाईल
अंगण, वसरी, गोठा सारं
सूनसून होईल......
दारी सजतो मांडव
पण उरात भरते धडकी
आता मला सोडून जाणार
माझी चिमणी लाड़की.........
सूर सनई चे पडता कानी
डोळा येते पाणी
आठवत राहातात छकुलीची
बोबडी बोबडी गाणी...........
भरलेल्या मांडवात बाबा
कहाणी सांगत असतात
कल्याण झालं म्हणत-म्हणत
सारखे डोळे पुसतात.........
पुन्हा पुन्हा लेकी कडे
बाबा पहातात चोरून
कितीही समजूत घातली तरी
डोळे येतात भरून...........
हुंदके म्हणजे काय असतात
पहिल्यांदाच कळतं
कौलारूच्या छपरावनी
बापाचं मन गळतं.......
सरी मागून सरी येऊन
डोळे वाहात राहतात
चिऊ काऊच्या गोष्टी ऐकत
चिमण्या उडून जातात...
लेकीचा सांभाळ करा म्हणून
बाप हात जोडीत राहतो
डोळ्या मधे पाणी आणून
केविलवाणे पहात रहातो........
लेक लावतो वाटी पण
बाप जातो तुटून
हुंदका जरी दाबला तरी
काळीज जातं फुटून..........
पोटचा गोळा दिल्या नंतर
पापणी काही मिटत नाही
कितीही डोळे पुसले तरी
पाणी काही आटत नाही
कुठलीच लेक आपल्या आई वडिलांना दुःख देत नाही हे खरं आहे. ती देते तर प्रेम. मुलगा असो व मुलगी कधी लहानाचे मोठे झाले कळत नाही पण मुलगी मोठी होणे फार वेगळी गोष्ट आहे. कारण मुलगी मोठी झाल्यावर ती लग्न होऊन दुसऱ्या घरी जाणार असते. आपलं घर अंगण सोडून जाणार म्हंटले की सगळ्या भावना दाटून येतातच आहे की नाही. मांडव, सनई - सगळी लगीनघाई तिचे बालपण, तिचे प्रेमळ वागणं सगळंच आठवते. मुलगी होणं खरंच कल्याणकारी असते आपल्या काळजाची कोर दुसऱ्या हाती सोपवणे फार मोठं मन लागतं त्याच्या साठी. सासरी जाणाऱ्या मुलीचा बाप हाथ जोडतो पण आतून तुटून जातो. जर तुम्ही एका कन्येचे माता पिता असाल तर नक्की शेयर करा आणि नसाल तरीही शेयर करा कारण तुमच्या घरी कोणाची तरी लेक नांदायला नक्की येईल.
धन्यवाद!
इमेज क्रेडीट: - मराठी वेडिंग्स
आपण सर्व वाचक मंडळीस माझी विनंती आहे की आपले विचार आपण मुक्त पणे कंमेंट करावेत जेणे करून या ब्लॉग ची सुधारणा होईल तसेच अन्य वाचकांचे ज्ञान वाढेल.
No comments:
Post a Comment