इमेज क्रेडिट : क्लाइमेट चेंज फॉर फैमिलीज़
हे वाक्य आपण (म्हणजे निदान मराठी) लोकांनी लहानपणी जेवताना, खाताना सर्रास ऐकलं असेल. अर्थात पान म्हणजे ताट हेही आजकाल सांगावं लागतं.
जेवताना ताट साफ करणं हे अगदी कंपल्सरी होतं.
आम्ही भावंडं जेव्हा मामा कडे जायचो, आणि जर मामा आमच्या शेजारी जेवायला बसला, तर आमची धडगत नसायची, कारण जेवून झाल्यावर उठताना, ताटात फक्त मिरच्यांचे तुकडे, कढीपत्त्याची पानं एवढंच दिसलं पाहिजे असा त्याचा दंडक असायचा.
तसच आई बाबा ही घरी जेवताना कायम तिकडेच लक्ष द्यायचे.
त्यामुळे, "लागलं तर आणखी मागून घे, पण ताटात टाकायचं नाही" त्यामुळे साहजिकच थोडं वाढून घेतलं जायचं.
पूर्वीच्या लग्ना मुंजींमध्ये अगदी पैज लावून पक्वान्न खाल्ली जायची, ते ही पूर्ण जेवण जेवून मग, जिलब्या, किंवा लाडूची ताटच्या ताटं, फस्त केली जायची. आणि दुसर्यापेक्षा एक जिलेबी, किंवा लाडू अधिक खाणारा जिंकायचा.
पण नियम तोच. "पानात टाकायचं नाही".
नंतर नोकरीच्या निमित्तानं भरपूर फिरणं झालं, तेव्हा एक मोठा फरक लक्षात आला.
गुजराथ, महाराष्ट आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये आपल्या सारखाच अलिखित नियम, ताट साफ करण्याचा!
पण उत्तरेकडील राज्यात, जेवताना ताट साफ करणं म्हणजे भिकेचं लक्षण मानतात.
तिथे जेवताना ताट साफ केलं की तुम्हाला जेवण कमी पडलंय असं मानतात. नॉइडा ला एका मित्राच्या घरी जेवायला बोलावलं होतं.
मी आपला नेहमीच्या सवयी प्रमाणे ताट चाटून पुसून साफ केलं. हात धुताना मागे त्याच्या आईला बोलताना ऐकलं.
"देखा, कैसे खाया है, प्लेट मे एक दाना नही छोडा. कितने दिन का भुखा था क्या मालूम!"
हे असं! आता काय बोलणार.
पण साधारणतः त्या बाजूला मुलांनी ताटात टाकलं की आई नाही तर आज्जी, " कोई नही, कोई नही बेटा, जितना जायेगा उतानाही खाना, बाकी का छोड दे." असच ऐकलंय.
पण ती संस्कृती आपल्याइथंही रुजू लागलीय. हल्ली इथल्या आया ही सांगतात "जात नाहीये का?, मग राहूदे"
विशेषतः मी केटरिंग व्यवसायात आल्यापासून तर अन्नाची नासाडी एवढी नजरेला पडते, आणि खूप वाईट वाटतं. बुफे पद्धती खरतर आली ती आपल्याला जेवढं हवं तेवढंच वाढून घ्यावं ह्या करता, पण परत उठायचा कंटाळा, जेवण घ्यायला असलेली लाईन हे बघून, लोक भरमसाठ वाढून घेतात, मग त्या ताटात, भेंडी मसाल्यात एका बाजूने तवा भाजीचा रस्सा मिसळतोय, दुसऱ्या बाजूने त्यात बुंदी रायता घुसू पाहतोय. त्यात रोटीचे एक टोक बुडी मारतंय. वाटीतून बासुंदी ओव्हरफ्लो होतेय. त्या बासुंदीत पापड डुंबतोय.
खाली पुलावावर डाळ पहुडलीय, त्यात काकडी, टॉमेटो तरंगताहेत. त्यात त्या सगळ्यांना बाजूला सारून हराभरा कबाब स्वतःची जागा पटकाऊ बघतोय. वरून फ्रायम नावाच्या चकत्या गार्निश केल्यासारख्या या सगळ्या पदार्थांवर पसरलेल्या असतात.
आता एवढं सगळं वाढून घेतल्यावर त्यातलं २५% सुद्धा खाल्लं जात नाही. कारण जेवणाच्या आधी हावरटासारखे वेलकम ड्रिंक चे ४/५ ग्लास रिचवलेले असतात. बरं आम्ही काही बोलायला जावं तर, आम्ही पैसे देतोय ना? मग तुम्हाला काय त्रास आहे, हे ऐकावं लागतं.
मग आम्ही गप्प!
५०० माणसांच्या जेवणाची ऑर्डर असेल तर अश्या उष्ट्या खरकट्या ताटांमधून कमीत कमी १५० माणसांचे जेवण फुकट जातं.
माझ्या स्नॅक्स सेंटर मध्येही असे फुकट जाणारे अन्न रोज बघतो, जीव कळवळतो, मग आता मी निदान माझ्या दुकानात तरी सांगायला सुरुवात केलीय, की आधी चव घेऊन बघा, आणि मग घ्या. अन्न फुकट घालवू नका.
मध्यंतरी पुण्याला गेलो असताना, दुर्वांकुर या थाळी पद्धतीच्या हॉटेल मध्ये जाण्याचा योग आला, आणि तिथल्या एका पुणेरी पाटी ने लक्ष वेधून घेतलं.
"जेवताना ताटातील पदार्थ पूर्ण संपवले तर १०% सवलत."
आणि जेवता जेवता हळूच इकडेतिकडे नजर फिरवली तर बऱ्याच जणांनी पदार्थ पूर्ण खाल्लेले दिसले. माझी उत्सुकता चाळवली आणि मग बिल द्यायच्या वेळी मालकांना त्या पाटी बद्दल विचारलं. तर त्या मालकांनी (पुणेकर असूनही) हसून त्या मागचं लॉजिक मला सांगितलं.
" अहो माणसाची मनोवृत्ती ही कायम सवलत मिळण्याकडे असते, मग तो कितीही श्रीमंत असला तरी. २०० रुपयांवर जर २०रुपये सवलत मिळते तर ताट साफ करूया असे म्हणून लोक पदार्थ संपवतात.
पण मी म्हणतो ही वेळ का येऊ द्यावी? आपल्याला परवडते म्हणून वाट्टेल तेवढं अन्न फुकट घालवायचे का?
अश्या वेळी एका कॅन्टीन मध्ये लावलेली पाटी बरंच काही सांगून जाते.
श्रीरंग खटावकर
No comments:
Post a Comment