---------------
जाऊ द्या , जे व्हायचं ते झालं
पुन्हा पुन्हा नको त्या गोष्टी काढायच्या नाही
नविन वर्ष रडत-कुढत जगायचं नाही ........
काही चांगलं काही वाईट होतच असतं
हातावर हात देऊन बसायचं नसतं
साध्या-साध्या गोष्टी वरून चिडायचं नाही
नविन वर्ष रडत-कुढत जगायचं नाही ..........
सगळं चांगलं होईल काळजी करु नका
प्रयत्न चालु ठेवा हिंमत हारु नका
मूलं करतील अभ्यास नवराही वागेल चांगला
आज शक्य नसेल तर उद्या बांधा ल बंगला
मुलाला लागेल नोकरी अन सुन सुद्धा येईल
मनासारखा जावई मिळून मुलगी सासरी जाईल
डोक्याला हात लावून बसायचं नाही
नविन वर्ष रडत-कुढत जगायचं नाही
हो हो बायको सुद्धा चांगलं वागेल भांडणार नाही
गा-हाण्याच दुकान रोज मांडणार नाही
हळू हळू सगळे जण योग-प्राणायाम करतील
सर्वांच्या तब्यती ठणठणीत राहतील
दूर दूर गेलेले पुन्हा जवळ येतील
" चुकलो मला माफ करा " विसरून जा म्हणतील
आपण सुद्धा मनात काही ठेवायचं नाही
नविन वर्ष रडत-कुढत जगायचं नाही
समजू नकोस " मी "च शहाणा बाकी सगळे वेडे
उंच स्वरात बोलण्याने सूटत नसतात कोडे
अहंकार जपू नकोस दुसऱ्यालाही किंमत दे
हिडिस-फिडिस् वागणं सोडून इतरांना हिंमत दे
भावनेच्या रांगोळीला तुड़वायचं नाही
नविन वर्ष रडत-कुढत जगायचं नाही
कुळाचार कुळधर्म जमेल तसं करत जा
कुठेतरी श्रद्धा ठेऊन पायावर डोकं ठेवत जा
देव असेल किंवा नसेल देवपूजा करत रहावं
कुटुंब एकत्र येण्यासाठी सण साजरे करीत जावं
माणसं देतात दुःख म्हणून नाती-गोती तोडू नकोस
' प्राणवायु ' दिसेना म्हणून अस्तित्व खोडू नकोस
संस्कृतीच बोट कधीच सोडायचं नाही
नविन वर्ष रडत-कुढत जगायचं नाही .
No comments:
Post a Comment