YouTube

Wednesday 2 October 2019

चित्रकार


@doctorforbeggars

एक होता गरुड !

या गरुडाचे वडिल, तो लहान असतांनाच देवाघरी गेले... !

आईने सांभाळ केला जमेल तसा आणि बहिणीकडे आली रहायला गरुडाला घेवुन... !

कालांतराने आईही वारली... गरुड आता एकटा पडला... !

मावशीनं घराबाहेर काढलं... !

गरुडच तो... उडाला उंच आकाशात... ! भरा-या घेत राहिला... मस्त मजेत... !

नियतीला बघवलं नाही... एका अपघातात गरुडाचे पंख निकामी झाले... आभाळाचा राजा असणारा... हा गरुड... आला जमिनीवर... !

जमिनीवर पडलेल्या गरुडाला बघुन लोक हसायला लागले, थट्टा करायला लागले, त्याच्या या वाईट काळावर हिणवायला लागले... !

खरं सांगु ? कुणाच्या वाईट काळावर हसु नये... ! कदाचित हा वाईट काळ आपलाही चेहरा लक्षात ठेवेल.... काय सांगावं... ?

हाच निकामी झालेला गरुड, आज शनिवारी मला भेटला, मारुती मंदिराबाहेर !

आई गेल्यावर कष्टाची कामं केली... पण एका अपघाताने दोन्ही पाय निकामी झाले... ! नोकरी गेली... !!!

जगण्यासाठी मग हा मार्ग पत्करला... !

माझ्याकडनं औषधं घेतली, आणि गुपचुप बाजुला जावुन बसले... !

इतर भिक्षेक-यांना चेक करत असतांना, माझं यांच्याकडे लक्ष होतं... !

एका कळकट्ट कॕरीबॕग मधुन त्यांनी एक पेपर काढला... शिस पेन्सील, टेलर लावतात तशी कानाला अडकवलेली होतीच... हातात अजुन दोन तीन रंगीत पेन्सीली आणि खोडरबर !

त्यांनी या कागदावर काहीतरी रस्त्यावरच रेखाटायला सुरुवात केली... !

भर रस्त्यात मारुतीचं मंदिर आहे हे... हो भर रस्त्यातच !

आता मारुतीरायाला जरा बाजुला सरकता का ? हे बोलायची कुणाची टाप आहे का ?

याच मंदिराबाहेर भर रस्त्यातच आम्हीही बसलो होतो...

भयानक गर्दी, आजुबाजुनं भरधाव जाणाऱ्या गाड्या, त्यांचे हाॕर्न...  ट्रॕफिक मध्ये अडकलेल्या मागच्या लोकांचे शेलक्या भाषेतले "सुविचार", एकमेकांच्या आईची आठवण काढत आरडा ओरडा करत चाललेला सुसंवाद... या सर्वांतही हे दादा शांतपणे कागदावर काही रेखाटत होते... !

आजुबाजुच्या परिस्थितीचा काही एक फरक यांच्यावर पडलाय असं दिसत नव्हतं... !

ते काहीतरी रेखाटत होते... तल्लीनतेने...  तल्लीनता काय असते... ते मी आज पाहिलं... !

ब-याचवेळानं माझी कामं आटोपल्यावर, त्यांच्याजवळ बसत म्हटलं, बघु दादा कसलं चित्रं काढलंय ?

ते चमकले... म्हणाले, आँ... तुमाला कसं कळलं...?

डोळे मिचकावत, हसत मी म्हटलं, माझं लक्ष होतं तुमच्याकडे...

त्यांनी त्याच कळकट्ट कॕरीबॕग मधुन, अर्धवट काढलेल्या गणपतीचं सुंदर चित्र दाखवलं... !

मी पहात राहिलो या चित्राकडं...! 

केवळ पेन्सिलीने गणपती बाप्पा कागदावर उमटले होते, कलेच्या रुपाने... यांच्या हातात वसले होते...

यांनीही या कलेचं विसर्जन करायचं सोडुन, ही कला जपली होती ...!

मी म्हटलं, लहानपणापासुन काढता चित्रं कि कुठं शिकलात ?

छ्या छ्या... लहानपणापासुन नाय... हे पाय निकामी झाल्यापासुन, उगंच आपलं हाताला कायतरी चाळा म्हणत म्हणत सुरु केलं हे...!

मनात म्हटलं,  नियतीनं पायातली ताकद काढुन घेतली पण... हातात तीच ताकद वेगळ्या रुपात ठेवली... !

कुठेतरी खड्डा पडला कि दुसरीकडे भर होतच असते.... एव्हढंच कि आपल्याला खड्डा दिसतो... पडलेल्या भरीकडे आपण लक्षच देत नाही !

कौतुक करत मी त्यांना म्हटलं...  खरंच अवघड आहे हे, असं रस्त्यात बसुन चित्रं काढणं हां ...

ते म्हटले, छ्या छ्या ... अवघड काय... अहो डाक्टर काही करायचं असेल तरच "मार्ग" दिसतो... काही करायचं नसेल तर "कारणं" दिसतात !

खरंय... मी बोललो... !

कुणी आहे का अजुन जवळचं दादा तुम्हाला...?

मी नगर जिल्ह्यातला ... जवळचं कुणी सापडतंय का, हेच शोधत इतक्या दुरवर आलो... ते केविलवाणं हसत म्हणाले... !

खरंच, जवळचं कोण हे शोधायलाच खुप पायपीट करावी लागते... परके सगळे आजुबाजुलाच असतात हे मात्र खरं !

दादा पाय साथ देत नाहीत, म्हणुन नोकरी गेली... आता मागुन खावं लागतं... हे असं मागणं आवडतं का तुम्हाला ? मी मुद्द्यावर आलो !

नाय आवडत वो ... खुप कोशीस केली... काम करायची... पण नाय दिली नौकरी कुणी... हातातल्या पेन्सिलीच्या टोकाशी खेळत ते बोलले...

म्हटलं... दादा हातात कला आहे तुमच्या... या चित्रकारीनं कसंही जगता आलं असतं... !

होय ओ डाक्टर, पण चित्रकारीला पण पैशे लागतात... मिळतंय त्यात खावु किती आणि कागद घेवु किती ? मी लय मोटा चित्रकार झालो असतो पण रंगाला पैशे नाहीत... म्हणुन रंगीत पेन्शीली वापरतो...पैसा असता तर लय काय काय केलं असतं... आणि...

मध्येच मी त्यांना तोडत म्हटलं...  दादा एक सांगतो, लक्षात ठेवा...!

प्रत्येकजण म्हणतो... पैसा असता तर "कायतरी" केलं असतं... पण पैसा काय म्हणतो, माहित आहे ?  आधी "कायतरी" कर... मग मी येतो !

त्यांचे डोळे चमकले... !

म्हणाले मग काय करु म्हणता ?

म्हटलं या चित्रकारीलाच व्यवसाय करायचं आपण ...

हो पण कसं... ? सुरुवातीला कागदं आनी रंग लागंल, तो कोन  देईल ?

म्हटलं ... मी देतो !

कधी.... ?

आत्ता... !

आत्ता म्हणजे ?

आत्ता म्हणजे... आत्ता लगेच !

खरं... ??? माझा हात धरुन अविश्वासानं ते बघायला लागले... !!!

हातात धरलेला त्यांचा हात दाबत म्हटलं...आता धरलाच आहे हात तर सोडु नका... ! तुम्हाला चित्रकार बनायचंय ना ?

होय... थरथरत्या ओठांनी ते बोलले... !

बोलत असतांनाच, त्यांच्या डोळ्यातलं पाणी, थेट गालावर आलं आणि आमच्या हातांवर सांडलं... !

आमच्या इच्छाशक्तीवर नकळतपणे झालेला अभिषेकच तो जणु !

आनंदानं फुललेला त्यांचा चेहरा पाहुन... मी हि हरखुन गेलो !

एक भिक्षेकरी आता चित्रकारी करत कष्टकरी होणार !

आनंदलेला त्यांचा हा चेहरा पाहुन, मी त्यांना गंमतीनं म्हणालो...

तुमचा चेहराच आता माझ्यासाठी एक सुंदर चित्र झालंय दादा... !

हसत म्हटलं, विना पेन्सिलीनं मी पण एक चित्र तयार केलं आज... !

ते ही तेव्हढ्याच दिलखुलासपणे हसत म्हणाले... तुमी काढलेल्या या चित्रावर रंग मी भरणार डाक्टर ... !

मी हुंदका आवरला, त्यांनी मात्र आवरला नाही !

काहीवेळा काही गोष्टींना आवरायचं नसतं... ! मुक्तपणे वाहु द्यायचं असतं... !

सामान घेवुन देण्यासाठी मी उठलो.. खिसे चाचपले.... !

खिशात मोजुन 130 रुपये मिळाले... !

यात सामान येणार कसं... ? मी स्वतःवरच चरफडलो !

आई नेहमी म्हणते, बाहेर पडतांना, पैसे बरोबर असु द्यावेत. कोणत्या वेळेला लागतील सांगता येत नाहीत... !

मला हे वाक्य आठवलं... ! आसपास ATM शोधलं... नव्हतंच !

स्वतःला मुक्तपणे चार शिव्या वाहिल्या आणि परत येतो पैसे घेवुन दादा बरं का हे सांगायला निर्लज्जपणे मागे फिरलो...

माघारी येत असतांना, एका अनोळखी मॕडमनी वाट अडवली... म्हणाल्या... You are Dr. Sonawane, right ?

म्हटलं Yes madam ! आपण ?

अहो, आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त मला काही डोनेशन द्यायचंय तुम्हाला... !

मी बराच वेळ तिकडे मारुती मंदिराकडे शोधत होते... शेवटी निघालेच होते... बरं झालं भेटलात.... हे घ्या 3000 रुपये... बाय...!

म्हणत त्या नजरेआड झाल्या... !

पैसा म्हणतो, तुमी "कायतरी" करा मग मी तुमच्याकडे येतो, याची प्रचिती पुन्हा आली... !

चाललेल्या या खेळावर मी पुन्हा हसलो... विचार केला, मॕडमच्या रुपानं कुणी बरं पाठवले असतील हे पैसे ?

नाव गांव न सांगता त्या निघुन गेल्या... अपुर्ण चित्रांत माझ्या एक रंग भरुन गेल्या... !

मी झपाट्यानं आलो... बुलेट काढली, म्हटलं चला दादा, बसा पट्कन गाडीवर, सामान आणु... !

ते ओशाळले... म्हणाले... लोकं काय म्हणतील ? माज्यासारख्या भिका-याला कुटं गाडीवर बसवता सायेब ? बरं दिसत नाय... !

म्हटलं... आज मी भिका-याला माझ्या गाडीवर बसवत नाहीये, एका चित्रकाराला बसवतोय !

ते गोड हसले... कुबड्या सावरत, कसरत करत गेलो, लागणारं सर्व सामान मोठ्ठ्या पिशवीत भरुन परत आलो... !

या पिशवीत चित्रकलेचं सामान नाही, आमची स्वप्नं होती !

उतरतांना म्हटलं, जास्तीत जास्त  चित्रं काढुन तयार ठेवा.

*सर्वांना माझी हात जोडुन विनंती आहे, यांच्या हाता पायांनी आणि सख्ख्यांनी यांची साथ सोडली आहे... आपणच यांचे हातपाय होवुया का ? थोडंसं यांचंही सख्खं होवुया का ?*

*यांची चित्रं विकत घेवुन, यांच्यावर "भिकार" म्हणुन बसलेला शिक्का पुसुन, यांना "चित्रकार" बनण्याची संधी देवुया का ?*

*मी बोलेनच, सविस्तर पुन्हा  याबाबतीत.... !*

निरोप घेताना, ते मला म्हणाले... डाक्टर, माजं जरा चुकलंच... मिळणाऱ्या भिकेतले थोडे पैशे साटवुन, मी आधीच हातपाय मारायला हवे होते...

उगंच इतके दिवस भीक मागुन, स्वतःचा कमीपणा करुन घेतला... पायातली चप्पल नीट करत.... जमिनीकडे बघत ते बोलले... !

म्हटलं , असु दे... काही गोष्टींना वेळ यावी लागते... ती आज आली !

शेवटी कसंय... आपल्याकडनं चुका होतात...ही झाली "प्रकृती"... चुका मान्य करणं ही झाली "संस्कृती"... आणि चुका  सुधारण्याचा प्रयत्न करणं... ही "प्रगती"... !

या अपंग बाबांना आणि दुस-या एका अपंग मुलाला चित्रकार म्हणुन पुढं आणायचं माझं नी मनिषाचं स्वप्नं आहे !!!

अनंत अडचणी आहेत, पण आपणां सर्वांच्या साथीनं... या अडचणींची झळ जाणवत नाहीय... !

या प्रवासात एक मात्र कळलंय...!

ऊन्हं कितीही प्रखर असली... तरी ती समुद्राला कधीच आटवु शकत नाहीत... !!!

आम्हीही आमच्या मनात असाच  एक समुद्र साठवलाय... न आटणारा... !

अशाच भिकारी कलकराना मदत करण्यासाठी संपर्क करा।

*डाॕ. अभिजीत सोनवणे*
*डाॕक्टर फाॕर बेगर्स*
*सोहम ट्रस्ट, पुणे*
*9822267357*
*abhisoham17@gmail.com*
*www.sohamtrust.com*
*Facebook : SOHAM TRUST*

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...