ह्या कथेच्या लेखिका कोण मला महित नाही पण प्रसंग हा शेयर करण्या जोगता आहे म्हणून इथे परत एकदा शेयर करत आहे. खरच आयुष्यात जर काही आहे तर ते केवळ आनंदी राहण हेच या कथेतून लेखिकेने व्यक्त केले आहे. सोशल ऍप्प वर सहज वाचनात आली आणि आवडली म्हणून तुम्हां सर्वांसाठी.
छायाचित्र श्रेय: स्टॉक अनलिमिटेड
2004 मध्ये काही महिने योगेशच्या (माझे पती) नोकरीनिमित्त इंग्लडमधील शेफील्डमध्ये राहत होतो तेव्हाची गोष्ट. योगेशची बाॅस पॅट 40 वर्षाची झाली म्हणून पार्टी होती. चाळीशीचे विशेष कौतुक पहिल्यांदाच इतके पाहिले.
आम्ही सहा ह्या जण छोट्याश्या पार्टीसाठी एकत्र आलो. पॅटचा पार्टनर एरिक (तिकडे पार्टनर असतो हे नवे ज्ञान) तिच्यासोबत होता. त्याची नव्याने ओळख झाली आणि अजून एक इंग्रज जोडी ...
माझे वय तेव्हा साधारण 26/27 . हा एरिक त्या दिवशी माझ्या आयुष्याला मोठी कलाटणी देऊन गेला..आयुष्यात जागोजागी अनेक लोक भेटतात ,काही ना काही देऊन जातात..
पॅटने त्या दिवशी शिकवले..चाळीशीतही कसं मस्त तरुण जगायचं! आयुष्यातील प्रत्येक टप्पा स्वीकारताना बहरत लहरत जगायचं. हि जोडी आवडली मला .
टेबलवर रंगलेल्या गप्पांच्या ओघात मी एरिकला विचारले कि तो काय काम करतो? ह्या प्रश्नाचे जे उत्तर मिळाले त्याने मला खडबडून शुध्दीत आणले
तो म्हणाला,"मी स्टेशनवर झेंडा दाखवतो"
मी आणि योगेश नि:शब्द, कारण पॅट योगेशच्या ऑफिस मधे उच्चपदस्थ अधिकारी.
योगेश शांत बसला पण माझी जिज्ञासा म्हणा किंवा भोचकपणा. ..मला शांत राहू देईना. "पृच्छकेन सदा भाव्यम" अर्थात :प्रश्न विचारत रहा.
मी पुढे परत विचारले, "सुरवातीपासून तिथेच आहेस का? "
नव-याचा जळजळीत कटाक्ष... माझे दुर्लक्ष ... पण हा पठ्ठ्या तर खूष झाला अजूनच ,ह्या प्रश्नाने. म्हणाला, "Nope,मीही software कंपनीमध्ये अधिकारी होतो ,चाळीसाव्या वाढदिवसापर्यंत.... वयाच्या 20 ते 40 पर्यत वीस वर्षे खूप काम केले ... पैसे साठवले फिक्स केले.. आणि आता मी माझे जुने स्वप्न जगतोय..
" स्वप्न म्हणजे?" मी
"मी लहानपणी जेव्हा जेव्हा स्टेशनवर यायचो माझ्या माॅम बरोबर तेव्हा मला हा सिग्नलमॅन फार भुरळ घालायचा.. वाटायचे किती lucky आहे हा अख्खी ट्रेन थांबवू शकतो आणि त्याच्या हातातले दोन झेंडे मला रात्री स्वप्नातही दिसायचे. मग मोठा होताना हा सिग्नलमॅन मागे राहिला. मी ही चारचौघांसारखा खूप शिकलो. .Exicutive post वर आलो आणि routine मधे अडकलो. पण चाळिसाव्या वाढदिवसाला शांत मनाने ठरवले.. आता ह्या बिग मॅन एरिक ने small kid एरीकचे स्वप्न पूर्ण करायचे आणि दुस-या दिवसापासून स्टेशनवर रुजू झालो ते माझे आवडते लाल हिरवे झेंडे हातात घेतले. मी त्या क्षणाच्या आजही प्रेमात आहे..." एरीक मस्त छोट्याश्या एरीकसारखा हसला , मग मोठ्या माणसासारखा बीअर रिचवू लागला.
पार्टी संपली.. मी आणि योगेश घरी आलो तेव्हा दोघेही एरीकच्या प्रेमात पडलो होतो. भूतकाळात मागे टाकलेले, हरवलेले, विसरलेले आपापले हिरवे, लाल झेंडे आठवले... माझी डायरीत राहिलेली कविता... अर्ध्या वाटेवर राहिलेलं गाणे.. योगेशची एखादे वाद्य शिकण्याची अपूर्ण इच्छा.. बरंच काही...
आज तो नवा गुरु प्रेरणा देऊन गेला....
1. पुढील काही वर्षे झटून काम करण्यासाठी ;
2. महत्वाकांक्षा आणि पैसा ह्यांच्या हव्यासात न हरवण्यासाठी;
3. हातात चाळीशीनंतर घेण्याचा आवडत्या रंगाचा झेंडा शोधण्यासाठी
मी अजून चाळीस ची व्हायची आहे परंतु मी माझा थोडा वेळ रोज माझ्या आवडत्या स्वप्ना साठी देते. तुम्हीही द्या आणि तुमचे अनुभव इतरांसाठी कंमेंट करा. आनंदी जगण्यासाठी ही कथा आणि तुमचे मजेशीर कंमेंट्स नक्कीच इतर वाचकांना प्रेरणा देतील.
No comments:
Post a Comment